चान्नी परिसरात पोलिसांचा धाक संपला?

गेल्या काही दिवसांत तब्बल 25 चोऱ्या

पातूर / सचिन मुर्तडकर : अकोला पातूर तालुक्यात येणाऱ्या चान्नी शिवारात गेल्या काही दिवसांत तब्बल 20 ते 25 चोऱ्या झाल्याने चोरांना मोकळे रान असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. येथील ठाणेदार अकोल्यात राहून येथील कारभार सांभाळत असल्याने हाताखालच्या कर्मचाऱ्यांवरही कुणाचा वचक उरलेला नाही. पोलिसांचा धाक संपल्याने चोरट्यांची हिंमत वाढली असल्याचेही लोक आता बोलू लागले आहेत.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथे काल शिवम्पान पॅलेसचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलसीडी टीव्ही, 5 हजार रोख आणि 10 हजारांचा पानमसाला असा एकूण 25 हजारांचा माल लंपास केला. पोलिसांनी नेहमीप्रमाणेच तक्रार दाखल करून घेत चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले.
यापूर्वीही शिवारातील खेट्री, पिंपळखुटा, चतारी येथे चोऱ्या झाल्या. मात्र, ठाणेदारच अकोल्यातून कारभार चालवीत असल्याने त्यांच्या हाताखालच्या कर्मचारी कामात चालढकल करीत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे या प्रकरणांत थातुरमातुर कारवाई झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ठाणेदार अकोल्यात राहात असल्याने एकूणच पोलिस ठाण्याचा कारभार बेताल झाला आहे. त्यामुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काल झालेल् चोरीबाबत तक्रार केली असता, आज विशेष पोलिस पथक व श्वानपथकाने आलेगावात जाऊन शोधमोहीम सुरू केली. पुढील तपास ‘नेहमीप्रमाणेच’ सुरू आहे.

You might also like
Comments
Loading...