कल्याण-डोंबिवली मनपामध्ये समाविष्ट गावांमध्ये सक्तीने मालमत्ता कराची वसुली करु नये : मुख्यमंत्री

devendra-fadnavis

नागपूर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 27 गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता महापालिकेने त्यांच्याकडून अतिरिक्त मालमत्ता कराची सक्तीने वसुली करु नये, असे निर्देश दिले जातील. या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य किसन कथोरे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, ज्या ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट होतात त्यांना सुरुवातीचे दोन वर्ष ग्रामपंचायतीप्रमाणे कर द्यावा लागतो. त्यानंतर वीस टक्क्यांनी करवाढ होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 27 गावांमधील नागरिकांची भावना लक्षात घेता यांच्याकडून सक्तीने वसुली न करण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील.

या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात अहवाल सादर करण्याविषयी सांगण्यात आले असून जुलैअखेर अहवाल प्राप्त होताच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या 27 गावांमध्ये अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 180 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.