जेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा रँक

टीम महारष्ट्र देशा : देशात अवघड मानल्या जाणाऱ्या जेईई या इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये पुण्याच्या राज आर्यन अगरवाल याने १०० पर्सेन्टाइल मिळवून देशात दुसरा रँक पटकावला आहे. जेईई हि परीक्षा देशातील आयआयटी व इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. राज बरोबरच अंकित कुमार मिश्रा व कार्तिक चंद्रेश गुप्त यांना १०० टक्के पर्सेन्टाइल मिळाले आहेत तर देशातून मध्यप्रदेशचा धु्रव अरोरा हा टॉप ठरला आहे. या परीक्षेला ९ लाख २९ हजार १९८ विद्यार्थी बसले होते.

यंदाच्या वर्षीपासून जेईई परीक्षेच्या स्वरूपात मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले असून जेईई ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. ही परीक्षा जानेवारी व एप्रिल मध्ये घेतली जाणार आहे. त्यानुसारच ८ ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये ऑनलाइन घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये राज अगरवाल देशात दुसरा आला आहे.

वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांना पर्सेन्टाइल देण्यात येत आहे. पर्सेन्टाइल याचा अर्थ इतके टक्के विद्यार्थी तुमच्या मागे आहेत. एप्रिलमध्ये आणखी एक जेईई परीक्षा होणार आहे. दोन्ही पैकी ज्या परीक्षेत चांगले पर्सेन्टाइल मिळाले आहेत, त्या आधारे त्या विद्यार्थ्याची रँक ठरवली जाणार आहे.