अहो ‘त्या’ हॉटेलमध्ये मी फक्त आंघोळीला गेलो होतो, सदाभाऊंची सारवासारव

sadabhau khot

टीम महाराष्ट्र देशा : राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे नागरिक हैराण झालें आहेत, जनावरांना चारा पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उन्हात वणवण करावी लागत आहे. सरकारमधील अनेक मंत्री दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यामध्ये स्वतःला शेतकरी नेते म्हणवणारे पशुसंवर्धन मंत्री सदाभाऊ खोत हे औरंगाबाद येथे दुष्काळ दौऱ्यावर असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिल्याने टीका होत आहे.

सदाभाऊ खोत हे औरंगाबाद येथे दुष्काळ दौऱ्यावर आहेत, दौऱ्यावर असताना त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचं समोर आलं आहे. एका बाजूला शेतकरी दुष्काळाच्या उन्हात तळपत असताना शेतकरी नेते म्हणवणारे सदाभाऊ खोत मात्र एसीच्या गार वाऱ्यात राहत असल्याची टीका केली जात आहे. सदाभाऊ खोत यांनी मात्र आचारसंहिता असल्याने शासकीय विश्राम गृहात जाता येत नसल्याने, आपण केवळ आंघोळ करायला हॉटेलमध्ये गेल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मी शेतकऱ्यांची व्यथा जाणणारा नेता आहे, माझ्याकडून असं पुन्हा घडणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना राज्यकर्ते निवडणुकीत गुंतले आहेत, टीका सुरु झाल्यानंतर मंत्री दुष्काळ दौरा करतायत, स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवणारे मंत्री जर पंचतारांकित संस्कृतीतून बाहेर पडणार नसतील, तर शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा राजू शेट्टी यांनी केली आहे.