वाद पेटणार : गणेशोत्सवात रात्री दहानंतर देखावे सुरु ठेवावे, पतित पावन संघटनेची मागणी

टीम महाराष्ट्र देशा;  पुणे : गणेशोत्सव ही केवळ पुण्याचीच नव्हे महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. ज्या गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांमुळे हा उत्सव मोठा झाला, त्यांच्यावर अनेक बंधने, अटी लादून उत्सवावर विरजण घालण्याचे काम प्रशासन करीत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील खटले त्वरीत मागे घ्यावेत, पुण्यातील विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत दोन बेस व दोन टॉप स्पिकर्स परवानगी द्यावी व जी मंडळे सामाजिक घडामोडींवर देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधन करतात अशा मंडळांचे उत्सवातील दहा दिवस देखावे रात्री दहानंतर पूर्णवेळ सुरु ठेवत स्पिकर्सची परवानगी द्यावी, अशा अनेक मागण्या करीत यासंदर्भात लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना तसेच नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे पुण्यामध्ये पतित पावन संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत गणेश मंडळांनी ठरविले.

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पतित पावन संघटनेतर्फे गणेशोत्सव व मंडळांकरीता नुकताच एक जाहीरनामा काढण्यात आला, यासंदर्भात आर्य सोमवंशी कार्यालय, अप्पा बळवंत चौक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, संपर्कप्रमुख स्वप्निल नाईक, दिनेश भिलारे, निलेश जोशी, मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर, गोकुळ शेलार, योगेश वाडेकर, सौरभ पवार, विजय क्षीरसागर, अक्षय राऊत, अमित खनिजे, यादव पुजारी, नरसिंग कोळी, शुभम कोष्टी यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीत ७८ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर अ‍ॅड.प्रताप परदेशी, रजपूत समाजाचे किशोर रजपूत हे देखील उपस्थित होते.

स्वप्निल नाईक म्हणाले, गणेशात्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळी दुस-या दिवशी स्पिकर्स बंद करावे, असे मंडळांवर घालण्यात आलेले बंधन दूर झाले पाहिजे. सर्व गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होईपर्यंत स्पिकर्स सुरु ठेवावे. ३१ डिसेंबरच्या पाटर्यांकडे पोलीस आणि प्रशासन काणाडोळा करतात. परंतु गणेशोत्सवाच्या वेळीच नियमांवर बोट दाखविले जाते. यामुळे कार्यकर्ते आणि मंडळांचे मनोधैर्य व उत्साह खच्ची करण्याचे का सध्या सुरु आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणेशोत्सवावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.

किशोर रजपूत म्हणाले, गणेशोत्सवावर घालण्यात आलेले निर्बंध एका मंडळापुरते मर्यादित नाहीत. त्याचा सर्व उत्सवावर परिणाम होतो. उत्सव अधिक विधायक होण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मंडळांनी आपली एकी दाखविली पाहिजे. गणेशोत्सव हा मंडळे आणि कार्यकर्त्यांमुळे जगाच्या कानाकोप-यात पोहोचला आहे, परंतु आज त्याच कार्यकर्त्याला दाबण्याचे काम केले जात आहे, असे झाले तर गणेशोत्सव फक्त कागदावरच राहिल, असेही त्यांनी सांगितले. वंदे मातरम् च्या समूहगायनाने बैठकीचा समारोप झाला.

 

‘यांना माहिती आहे सत्ता यांचीचं येणार , त्यामुळे भाजप नेत्यांना माज आलाय !’

पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या कामास प्राधान्य : फडणवीस