माहिती तंत्रज्ञान, कम्युनिकेशन क्षेत्रात राज्यात गुंतवणुकीची पोर्तुगालची तयारी

मुंबई  : उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून पोर्तुगाल देशातील गुंतवणूकदार देखील महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहिती पोर्तुगालमधील एका शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन दिली.

दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशातील राजकीय तसेच व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून पोर्तुगालचे एक शिष्टमंडळ मुंबईत आले होते. यावेळी शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.

माहिती, तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन क्षेत्रात पोर्तुगालची कामगिरी उत्तम असून भारतासोबत या क्षेत्रात काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच ऊर्जा, रस्ते, रेल्वे, फार्मा आदी क्षेत्रात काम करण्याची तयारी असल्याचे तसेच स्थानिक कंपन्यांसोबत समन्वय ठेवून उद्योग विस्तार करण्याची तयारी असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.

भारत-पोर्तुगालने एकमेकांच्या सहकार्याने प्रगती साधावी, यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. भारतातील आयटी क्षेत्रातील कंपन्या जगभरात आपला विस्तार करण्यास इच्छुक असून त्यांना पोर्तुगालनेदेखील सहकार्य करावे, असे श्री. देसाई म्हणाले. राज्यात सध्या विविध प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून या क्षेत्रात पोर्तुगालने गुंतवणूक करावी, त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे श्री. देसाई म्हणाले.

पोर्तुगालच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव युरिको ब्रिलहांट डायस, मॅन्युअल रामलेहरिया, सोफिया बटलाह, एन्टोनियो सिल्वा, मॅगुयल लॅटमन, विटोर कार्डोसो, फर्नांडो कोरिया, विटर फोन्सेस्का, अॅना पाणंदीकर. सोमेन बात्रा आदी उपस्थित होते.