सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा खरचं पचणी पडणारा आहे का?

Nana Patole

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या आधी देखील पटोले यांनी अनेकदा स्वबळाचा उल्लेख केला होता. मात्र, त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. इतकच काय तर काँग्रेसमधील इतर नेते देखील त्याकडे डोळेझाक करत होते. पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागा वाढवण्यासाठी केलेली ही स्टंटबाजी असल्याचेच सर्वांना वाटत होते. मात्र, आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर पटोले यांनी केलेली घोषणा सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस संपली अशीच काहीशी काँग्रेसची स्थिती झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील काँग्रेसचा प्रत्येक नेता केवळ आपला मतदार संघ वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय नाट्यामुळे सध्या काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, सत्तेच्या या गणितात काँग्रेसला किती महत्त्व दिले जातेय, हे सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुका महाविकास आघाडीत लढल्या जातील असाच कयास लावला जात होता. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांना विजयाची आशा होती. मात्र, आता काँग्रेस स्वबळावरच निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस राज्यात सत्ताधारी पक्ष असला तरी राज्यातील पक्षाची ताकद अत्यंत कमी झालेली आहे. पक्षाच्या अनेक आंदोलनातून ते वारंवार सिद्धही झाले आहे. नाना पटोले प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसला थोडेफार चैतन्य मिळाले असले तरी, त्याचा निवडणुकीत फायदा होईल, अशी परिस्थिती नक्कीच नाही. तरी देखील काँग्रेसचा स्वबळाचा ‘हट्ट’ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दाखवणारा असला तरी निवडणुकीनंतरच त्याचा परिणाम स्पष्ट होईल. या स्वबळाचा काँग्रेसला फायदा होईल की तोटा, हे तर आगामी काळातच स्पष्ट होईल. काहीही असले तरी काँग्रेसचा स्वबळाचा नारा सध्यातरी पचणी पडणारा नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP