कोरोना काळात सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे- अण्णा हजारे

anna hajare

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात रोज ७० ते ८० हजार कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत. सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. जनता काळजी घेत नाही  याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही तर सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणल्यानंतर कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतच गेली. सध्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण वाढळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. अत्यंत गरजेचे काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे.

बाहेर पडताना पूर्णपणे काळजी घ्यावी. मात्र जनता बेजबाबदारीने वागत आहे, विनाकारण घराबाहेर पडत आहेत. असे असले तरी याचा अर्थ सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारने वाढती रूग्ण संख्या पाहता वाढीव रूग्णालये उभारणे गरजेचे आहे.

आगामी काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे, याचा विचार करून रूग्णालये उभारणे गरजेचे आहे किंवा खासगी रूग्णालये ताब्यात घेणे आवश्यक आहे. कोरोनावर लवकर लस येईल, असे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे सद्यस्थितीला खूप गरजेचे आहे. असे अण्णा हजारे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-