विभाजना संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल- चंद्रकांत पाटील

chandrakant patil and vidhanbhavan and marathwada

मुंबई – प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे व्हावे यासाठी मराठवाडा विभागाचे विभाजन करून नवीन आयुक्तालय आणि नवीन जिल्ह्यांची निर्मीती हा लोकभावनेशी संबधित विषय असल्याने सांगोपांग विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

मराठवाडा विभागाचे दोन भागात विभाजन व्हावे यासाठी 5 जानेवारी 2009 ला निर्णय घेण्यात आला. त्यावेळी नांदेड जिल्ह्यात एक केंद्र असावे असे ठरले यासंबधित अधिक अभ्यास करण्यासाठी तत्कालीन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने बीड जिल्ह्याचे विभाजन करून लातूर, बीड आणि नांदेड ही तीन केंद्र व्हावीत असे सुचविले. याबाबत 2016 मध्ये अधिसूचना काढण्यात आली. याचा अहवाल 30सप्टेंबर 2016 ला आला. याबाबत व्यवहारिकता आणि आर्थिक भार या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी हा अहवाल मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात मराठवाडा क्षेत्रातील सर्व पक्षीय नेत्यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल आणि सर्व दृष्टीने या प्रस्तावाचा विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
उपरोक्त संदर्भात सदस्य सर्वश्री अमरसिंह पंडित, विक्रम काळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.