येणाऱ्या निवडणूकीत औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसचाच ‘महापौर’ विराजमान होईल, काँग्रेस शहराध्यक्षांचा दावा!

औरंगाबाद : महाराष्ट्रातील आगामी सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली आहे. नाना पटोले यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहमती दिल्याची माहिती पटोले यांनी दिलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादेत होणाऱ्या महापालिका निवडणुकांचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना ‘ये तो होणा हि था’, हि प्रतिक्रिया देत आता काँग्रेसचा महापौर मनपात विराजमान होईलच असा विश्वास व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीस अजून वेळ आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची जरी सत्ता असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची फरफट सर्वश्रुत आहे. त्यामुळे शहरातही काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही याचे संकेत फार पूर्वीच मिळाले होते.

सर्वात आधी नाना पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह संपर्क प्रमुख अमित देशमुख यांनी वारंवार शहरात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत स्वबळासाठी तयार राहण्यास सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही देशमुख यांनी आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकरी व कार्यकर्त्याने केले पाहिजे. येणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वानी जोमाने कामाला लागून महापालिकेवर तिरंगा फडकविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले होते. त्यामुळे आता शहरातही काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असून आधीपासूनच स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP