मराठवाड्याच्या विकासासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची भरीव तरतूद करणार- डॉ. भागवत कराड

मराठवाड्याच्या विकासासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची भरीव तरतूद करणार- डॉ. भागवत कराड

नांदेड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रसरकारच्या अर्थ राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. मराठवाड्यातील लातूर येथील भूमिपुत्र असून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी केले. ते जन आशीर्वाद यात्रेनिमित्त नांदेडात आले होते.

डॉ.भागवत कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. ज्या नवीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, अशांनी आपल्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढून केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहे. शिवाय ज्या कोणाला योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील असणार आहे. विविध संघटना, व्यापारी शिवाय अन्य सामान्य माणसांच्या तक्रारी आम्ही ऐकून त्याचे निराकारण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सोमवारपासून या जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली आहे. ही यात्रा परळी येथील गोपीनाथ गडावरून निघाली आहे.

सर्वार्थाने मागास असलेल्या मराठवाड्याच्या विकासासाठी लवकरच सर्व जिल्हाधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेणार आहे. या बैठकीत सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील सिंचन, आरोग्य, शिक्षण दर्जेदार असले पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून मंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या