पोटनिवडणुकांमध्ये भाजपकडून ओबीसी समाजातीलच उमेदवारांनी अर्ज भरलेत – पाटील

chandrakant patil obc

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरात आंदोलनं केली गेली. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने विरोधी पक्षांसोबत बैठका देखील घेतल्या. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर गदा आल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला असून ओबीसी नेत्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक पुढे ढकलाव्यात अशी भूमिका घेतली होती.

मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने रखडलेल्या पोटनिवडणुका त्वरित घेतल्या जातील असे संकेत दिले होते.

दरम्यान, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटताच या निवडणूक होत असल्याने ओबीसी समाजातून नाराजी वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या निवडणुकांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केलं. ‘ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न स्थगित असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या, तेव्हा ओबीसी समाजासाठी राखीव जागांवर भाजपच्या वतीने ओबीसी समाजातीलच उमेदवारांचे अर्ज भरले. सर्व अर्जांची छाननी पूर्ण झालेली असल्याने आता कुणालाही नव्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :