महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह वाहनचालक लाचेच्या जाळ्यात; औरंगाबादच्या पथकाची जालन्यात कारवाई

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह वाहनचालक लाचेच्या जाळ्यात; औरंगाबादच्या पथकाची जालन्यात कारवाई

लाच, bribe

औरंंगाबाद : ग्राहकाला आलेले ज्यास्तीचे वीजबिल कमी करून देण्यासाठी ३० हजाराची लाच मागून स्विकारणाऱ्या महावितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह त्याच्या खासगी वाहनचालकाला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने जालन्यात जाऊन केली असल्याची माहिती प्रभारी अपर अधीक्षक रूपचंद वाघमारे यांनी दिली.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता रेवानंद लक्ष्मण मोरे, दिपक रतन नाडे (रा.ढोरपुरा,रामनगर, जालना) अशी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या ताब्यात असलेल्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता व खासगी वाहन चालकाचे नाव आहे. तक्रारदार यांचा सोलर पॅनल फिटींगचा व्यवसाय असून त्यांचे ज्यातीचे वीजबिल कमी करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रेवानंद मोरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी मोरे यांनी ३० हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती.

तसेच लाचेचे पैसे आपला वाहनचालक दिपक नाडे याच्याकडे देण्याचे सांगितले होते. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, प्रभारी अपर अधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप राजपुत, पोलिस अंमलदार बाळासाहेब राठोड, दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चंद्रकांत शिंदे आदींच्या पथकाने सापळा रचून लाचखोर अतिरिक्त अभियंता रेवानंद मोरे यांना व त्यांचा वाहनचालक दिपक नाडे यांना ३० हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या