अॅरोबिक्स खेळात नगरमधील खेळाडूंचे कौशल्य कौतुकास्पद- आ.संग्राम जगताप

अहमदनगर : शारीरिक लवचिकता व फिटनेसची कसोटी पाहणारा एरोबिक्स क्रीडाप्रकार परदेशाप्रमाणे भारतातही चांगलाच लोकप्रिय होत आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात साधनसुविधा, प्रशिक्षणाची सुविधा असल्याने त्याठिकाणी खेळाडू या क्रीडा प्रकाराकडे वळतात. नगरमध्येही मागील काही काळात या एरोबिक्सकडे वळणा-यांची संख्या वाढत आहे. लहान वयापासूनच या खेळाचा नियमित सराव केल्यास खेळाडू मोठे यश मिळवू शकतो.नगरमध्येही असे खेळाडू तयार होऊन राज्य,राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करतील,असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
नगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये १२ वी जिल्हास्तरीय स्पोर्टस् एरोबिक्स,फिटनेस ऍण्ड हिपहॉप निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. जगताप बोलत होते. स्पर्धा उद्घाटनानिमित्त स्पर्धकांनी वैयक्तिक तसेच सामुहिक प्रकारात एरोबिक्सची थक्क करणारी प्रात्यक्षिके सादर केली.
आ.जगताप पुढे म्हणाले की,नगरमध्ये एरोबिक्समध्ये चांगले खेळाडू तयार होत असल्याचे आज प्रात्यक्षिकातून पहायला मिळाले. या खेळासाठी फिटनेस आवश्यक असतो.यासाठी संतोष खैरनार यांच्यासारख्या राष्ट्रीय प्रशिक्षकाचे मार्गदर्शन खेळाडूंना मोलाचे ठरत आहे.या खेळाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती देताना कार्याध्यक्ष संतोष खैरनार यांनी सांगितले की,शिर्डी येथे दि.१५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय एरोबिक्स स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्यासाठी आयोजित या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील १४० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.स्पोर्टस् एरोबिक्स,फिटनेस एरोबिक्स,स्टेप एरोबिक्स,हिपहॉप या चार क्रीडा प्रकारात स्पर्धा होऊन संघ निवड करण्यात येणार आहे.८, १०, १२,१४,१७ व १९ वर्षे वयोगटातून उत्कृष्ट खेळाडूंची जिल्हा संघात निवड होईल.स्पर्धेत संगमनेर,धुव्र ऍकॅडमी,संस्कृती स्कूल,मोरया स्कूल,राहुरी,त्रिमूर्ती पब्लिक स्कूल,नेवासा,वृध्देश्वर हायस्कूल, पाथर्डी,न्यू इंग्लिश स्कूल,पारनेर,प्रिती सुधाजी इंग्लिश स्कूल,राहाता,सिल्व्हरओक,शिर्डी,फ्युजन ऍकॅडमी,नगर येथील मुलांनी भाग घेतला.