राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेससाठी शिवसेनेसोबतची आघाडी ठरतेय अडचणीचा मुद्दा ?

shivsena vs congress

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र आता शिवसेनेसोबत जाणे हा मुद्दा कॉंग्रेससाठी अडचणीचा मुद्दा ठरू लागला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत देखील भाजपने हा मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेसवर शरसंधान केले होते. आता जेष्ठ नेते जितीन प्रसाद हे भाजपमध्ये गेल्यानंतर देखील हा मुद्दा चर्चेत आला आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार जीवनभर केला. भाजपशी युती करत त्यांनी काँग्रेसी विचारधारा आणि राष्ट्रवादीची विचारधारा याचा टोकाचा विरोध केला. मात्र बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच दोन पक्षांसोबत आघाडी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

शिवसेनेचे एकवेळ ठीक आहे पण कॉंग्रेसने हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत आघाडी केल्याने विचारधारेच्या मुद्द्यावरून टीका करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला असल्याची टीका सर्रासपणे भाजपकडून होऊ लागली. खरतर भाजपने देखील काही राज्यात अनैसर्गिक युती केल्याचे पाहायला मिळते मात्र सद्यस्थितीत कॉंग्रेसची अवस्था बिकट असल्याने हा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू लागला आहे.

जितीन प्रसाद हे भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रसाद यांच्यावर विचारधारेच्या मुद्द्यावरून टीका केली. ‘जितीन यांना भाजपचा प्रसाद मिळेल की केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपुरता त्यांचा वापर होणार आहे,’ असा सवाल त्यांनी केला. ‘विचारधारा महत्त्वाची नसेल तर असे पक्षबदल सहजतेने होतात,’ अशी टीका त्यांनी केली. ‘आता तुमची उपयुक्तता नाही असे सांगून काँग्रेसच्या नेतृत्वाने आपल्याला कधी पक्ष सोडायला सांगितले तर पुढे काय करायचे याचा आपण निर्णय घेऊ. पण, भाजपमध्ये जाण्याचा कधी विचारही करणार नाही. आपल्या मृत्यूनंतरच ते शक्य होईल,’ असे सिबल यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये असेपर्यंत आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत. आमचे २२ सहकारी काँग्रेसला मजबूत करण्याचे मुद्दे उपस्थित करीत राहतील, असे सिब्बल म्हणाले.

दुसऱ्या बाजूला जितीन प्रसाद यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून या टीकेलाही उत्तर दिले आहे. शिवसेनेसोबत युती केली तेव्हा नेमकी पक्षाची काय विचारसरणी काय होती? असा सवाल त्यांनी करत मर्मावर बोट ठेवले. विचारसरणी असे काही नसून देशहित ही एकच विचारसरणी असते. काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले तेव्हा काय विचारसरणी होती? आणि त्याच वेळेला ते केरळमध्ये डाव्यांसोबत लढत होते,’ असे सांगत जितीन प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीविरोधात वक्तव्यं केल्याने पक्षाचं नशीब बदलणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

दरम्यान, या पूर्वी देखील राष्ट्रीय राजकारणातील काही नेत्यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला टोले लगावले आहेत. प्रसाद यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेना हा कॉंग्रेससाठी राष्ट्रीय राजकारणात अडचणीचा मुद्दा ठरतो आहे का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP