नागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता  

nagpur corona

नागपूर : उपराजधानी नागपुरात कोरोनाचे थैमान अद्यापही कमी झालेले नाही. उलट रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. इतकेच नव्हे तर महानगरपालिकेने दिवसाला सात हजार तपासण्याचे लक्ष ठरवले होते पण मनुष्यबळाच्या अभावामुळे तपासणी संख्याही घटली आहे. गेल्या दोन दिवसांत बाधीत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दीड ते दोन हजारावरून सहाशेच्या खाली आली असली तरी अद्यापही भीती कायम आहे. एकूण बाधितांची संख्या ७४ हजार ८२१ आहे. त्यामुळे आज हा आकडा पाऊण लाखाच्या वर जाण्याची पूर्ण शक्यता आहे.

दररोज हजार ते दोन हजार बाधितांच्या संख्येने आरोग्य विभाग, मनपाच्या जिवाला घोर लागला होता. परंतु, आता गेल्या चार ते पाच दिवसांत बाधितांचा आलेख सातत्याने खाली घसरत आहे. आज अनेक दिवसांनंतर सहाशेपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळून आले. बाधितांच्या तुलनेत अडीच पटीने बाधित कोरोनामुक्त झाले. मात्र, रविवारी ४३ जणांचा मृत्यू झाला असून, यात शहरातील २३ जणांचा समावेश असल्याने अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे.

गेल्या काही दिवसांत चाचण्यांच्या संख्येत घट झाली. त्याचा परिणाम बाधितांच्या संख्येवर झाला. ४३५५ चाचण्यांचा अहवाल आज रविवारी आला. यातील ५९० जण बाधित आढळून आले.

यात शहरातील ३९८ जण तर ग्रामीणमधील १८८ जणांचा समावेश आहे. बाधितांच्या या संख्येसह एकूण बाधितांची संख्या ७४ हजार ८२१ पर्यंत पोहोचली. आज बाधितांची संख्या ७५ हजारांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ४३ जणांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे बळींची एकूण संख्या २ हजार ३८३ पर्यंत पोहोचली. दररोज चाळीसवर बाधितांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे.

बाधितांच्या कमी झालेल्या संख्येने बेजबाबदार होण्याऐवजी नागरिकांनी स्वतःच्या फिरण्यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

एकूण बाधितांमध्ये ५९ हजार ५४८ शहरातील असून १४ हजार ८६० ग्रामीण भागातील आहेत. ४१३ जण जिल्ह्‍याबाहेरील आहेत. शहरात आजपर्यंत २ लाख ११० अँटिजेन तर २ लाख ३५ हजार आरटीपीसीआर, अशा एकूण ४ लाख ३५ हजार १४४ चाचण्या करण्यात आल्या. शहरात १० हजार ५४८ तर ग्रामीण भागात ३ हजार ६२४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. या मोठ्या प्रमाणात घरीच उपचार घेत आहेत.

५८ हजार २६६ जण कोरोनामुक्त

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार काल १६५० बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील १३२० तर ग्रामीण भागातील ३३० जणांचा समावेश आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्या नागरिकांसह कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५८,२६६ पर्यंत पोहोचली. शहरातील ४६ हजार ९७३ जण योग्य आहार, औषधी घेत कोरोनाच्या तावडीतून सुटले. ग्रामीणमधील ११ हजार २९३ जण कोरोनामुक्त झाले.

महत्वाच्या बातम्या :-