नागपुरात महिला राष्ट्रवादीतर्फे प्रवीण दरेकरांच्या फोटोला चपलांचा हार

नागपूर : सोमवारी शिरुरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. यावरून नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. तर दरेकरांविरोधात राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली आहे.

दरेकर यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी दीक्षाभूमी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी दरेकर यांच्या फोटोला चपलांचा हार घालत निषेध नोंदविण्यात आला.

दरम्यान, दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकते. त्यातून तुमच्या वैचारिक दारिद्रय दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं. तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आज मला त्यांची कीव वाटते. ज्या पक्षाचा असला विचार आहे, अशा पक्षात या महिला काम करत आहेत. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येते अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या