fbpx

माढ्यात लढाई शिंदे-निंबाळकरांची; प्रतिष्ठा पणाला पवार- मोहिते पाटलांची

करमाळा/गौरव मोरे- माढा लोकसभा निवडणूकीचे दोन्ही बाजूने चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता लढाई राष्ट्रवादीच्या संजय शिंदे विरूद्ध भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांची होत असली तरी पवार आणि मोहिते-पाटील यांची
प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढ्याचा तिढा दोन्ही पक्षांकडून सुटल्यानंतर राष्ट्रवादीकडून विद्यमान जि प अध्यक्ष संजय शिंदे तर भाजपकडून साताराचे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे. शिंदे आणि निंबाळकर यांच्यात जरी ही लढाई होत असली तरी या निवडणूकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली.

माढा मतदारसंघातून माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे घोषित केले होते परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे माढ्याचा तिढा आणखी वाढला तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील माढ्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक होते परंतु राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप मध्ये प्रवेश केला.

तर राष्ट्रवादीने माढ्यातून ऐनवेळी सध्याचे भाजप पुरस्कृत जि प अध्यक्ष संजय शिंदे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली आणि माढा लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली. मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून संजय शिंदे यांची ओळख आहे त्यांची आणि मोहिते-पाटील यांचे राजकीय वैर्य सर्व जिल्ह्याला माहिती असल्यामुळे माढा लोकसभेला रंगत वाढलेली आहे.

काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणू असे सांगितले होते. अपेक्षेप्रमाणे साताराचे कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर झाली.

दुसरीकडे माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २००९ साली माढ्यातून शरद पवार विजयी झाले होते तर २०१४ ला मोदी लाट असूनही विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. कुठल्याही परिस्थितीत माढा लोकसभा जिंकणार असल्याचे शरद पवार सांगत आहेत.

माढ्यातून राष्ट्रवादी पराभूत झाली तर राष्ट्रवादीला सोलापूर जिल्हातून खूप मोठे खिंडार पडेल अशी भिती सध्या त्यांच्यावर आहे. तर संजय शिंदे राष्ट्रवादीकडून निवडून आले तर सोलापूर जिल्हात त्यांचा दबदबा वाढेल त्यामुळे संजय शिंदे यांना निवडणूकीत पराभूत करण्यासाठी मोहिते-पाटील यांनी कंबर कसलेली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात लढाई जरी शिंदे आणि निंबाळकरांची असली तरी पवार आणि मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागलेली आहे.