वादग्रस्त मालमत्ता प्रकरणे निकालात निघणार; औरंगाबाद मनपाचा विशेष उपक्रम

वादग्रस्त मालमत्ता प्रकरणे निकालात निघणार; औरंगाबाद मनपाचा विशेष उपक्रम

amc aurangabad

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत अनेक वादग्रस्त प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. मात्र आता प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीद्वारे मालमत्ता कराच्या वादग्रस्त प्रकरणांवर सुनावणी घेऊन ते निकाली काढली जात आहे. या समितीने आत्तापर्यंत २६ प्रकरणे निकाली काढल्याचे उपायुक्त तथा कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सांगितले.

आर्थिक वर्षे संपण्यास अवघे चार महिने शिल्लक असल्याने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीची मोहीम जोरात सुरु आहे. पहिल्या टप्प्यात कर थकविणाऱ्या व्यावसायिक मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. यात अनेक बडे थकबाकीदार आहेत. मात्र महापालिकेने चुकीचा कर लावला, चुकीचे क्षेत्रफळाची नोंद केली. जुना भरलेला कर अपडेट केला नाही, असे अनेक आक्षेप असलेल्या शेकडो मालमत्ता आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून या मालमत्तेकडून कर वसूल झालेला नाही.

त्यामुळे थकबाकीचे आकडे लाखोंच्या घरात आहेत. अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रशासक पांडेय यांनी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे व संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांनी सुनावणी घ्यावी, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार आठवड्याच्या पत्येक मंगळवारी सुनावणी घेतली जात आहे. आत्तापर्यंत २६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, सात प्रकरणे अंतिम टप्प्यात आहेत, असे थेटे यांनी सांगितले.

प्रभाग दोनमध्ये ८३ प्रकरणे

वसुली वाढविण्यासाठी प्रशासकांनी प्रत्येक प्रभागाची एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली आहे. या अधिकाऱ्यांना वादग्रस्त प्रकरणांच्या फायली समितीसमोर पाठविण्यासाठी सप्टेंबरअखेपर्यंची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार फायली दाखल केल्या जात आहेत. प्रभाग दोन अंतर्गत ८३ फायली सुनावणीसाठी आल्याचे थेटे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या