बीडमध्ये शिवसेनेच्या वाघांत राडा, जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीवरून दोन गटात हाणामारी

बीड : माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. यामुळे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीचे रुपांतर आज हाणामारीत घडले. त्याचे झाले असे की, आज गुरुवारी दुपारी १२ च्या दरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव शहरात येताच त्यांच्या स्वागतानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष धनंजय पापा सोळुंके आणि जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. यात शहराध्यक्ष पापा सोळुंके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव, परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. यांची निवड होताच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळुंके यांनी सोशल मीडियावर याचा निषेध नोंदवत शिवाजी चौकामध्ये निषेध नोंदवला होता.

दरम्यान, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अप्पासाहेब जाधव हे मुंबईहून आले असता त्यांची केसापुरी वसाहत या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान पापा सोळंके व त्यांचे साथीदार यांनी संभाजी चौकात वंगण घेऊन जाऊन मिरवणूक दरम्यान फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पापा सोळुंके व त्यांच्या साथीदारांना मारहाण केली. यावेळी धनंजय सोळुंके यांना जबर मार लागला असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले. माजलगाव, परळी, केज विधानसभा मतदारसंघासाठी यापूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले सचिन मुळूक यांच्या जागी माजलगाव येथील अप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, विश्वासात न घेता जाधव यांच्या निवडीचा निर्णय घेतला गेला असून फेरविचार केला नाही तर सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा माजलगाव, परळी, केज मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP