औरंगाबादेत आता संपूर्णत: लसीकरण बंद, साठा कधी मिळणार याकडे पालिकेचे लक्ष!

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र शासनाकडून लसींचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने वारंवार लसीकरणास ब्रेक लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात लसीकरण बंद आहे. आता कोवॅक्सिनचा साठाही संपल्याने आज (दि. २१) शहरात संपूर्णतः लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली. औरंगाबाद मनपाचे वाहन कोविशिल्ड लसी घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे. मात्र लसींचा साठा किती मिळेल याबाबत अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही. गुरुवारी पहाटेपर्यंत साठा शहरात दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी प्रशासन करत आहे. १८ ते ४४ वर्षावरील नागरिकांचे गतीने लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे लसीच मिळत नसल्याने आठवड्यातले एक-दोन दिवसच लसीकरण होत असून, उर्वरित दिवशी केंद्र बंद राहत आहेत. नागरिक लस कधी येणार? याची विचारणा करण्यासाठी केंद्रावर चरका मारत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकारी लसीकरण केंद्र बंद असताना खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करून ती नागरिकांना देण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे.

खाजगी दवाखान्यांमध्ये ३८ हजार लसींचा साठा शिल्लक असताना मनपा प्रशासनाकडे शून्य लसींचा साठा आहे. त्यामुळे गरीब, गरजू लसीकरणापासून वंचित राहत आहेत. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी वेटींग तब्बल ४० हजारांच्या पुढे गेली आहे. अनेकांचे शासनाने ठरवून दिलेले ८४ दिवस कधीच संपले असून, दररोज चौकशी करूनही त्यांना डोस मिळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने दररोज १५ ते २० हजार लसीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र तेवढा साठा मिळत नसल्याने निम्मे केंद्र बंदच आहेत. लसीकरण सुरळीत सुरु व्हावे यासाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP