औरंगाबाद मनपा निवडणुकीत काँग्रेसची फरफट की, संधी…?

औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकत्र काम करत असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षासोबत काम करतांना काँग्रेसची फरफट होतेय. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा अर्थमंत्री असल्याने काँग्रेसला प्रत्येक ठिकाणी स्वत:ची जागा तयार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागतेय. त्यातच आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका आम्ही एकत्र लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र, त्या आधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहतोय.

औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक देखील या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी आधीच औरंगाबाद शहरात स्वबळाचा नारा दिलाय. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केलंय. यामुळे औरंगाबाद मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र तर काँग्रेस आणि भाजप स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास या निवडणुकीत काँग्रेसची फरफट होईल की, काँग्रेसमोर मोठी संधी उभी राहिल यावर तर्क लढवले जात आहे.

शिवसेनेचा उदय होण्याआधीपासूनच औरंगाबाद शहरात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या काळातच महानगर पालिकेची स्थापना आणि पुढे विकास होत गेला. मात्र, शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यापासून औरंगाबाद मनपावर सलग युतीचीच सत्ता कायम राहिली आहे. यंदा मात्र, शिवसेना आणि भाजप मनपा निवडणूक स्वतंत्र लढतील. त्याचा फायदा काँग्रेसला होवू शकतो. औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रात सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा काँग्रेसची ताकद जास्त आहे. ती ताकद वाढवण्याचीही संधी काँग्रेससमोर असेल. मात्र, त्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.

असे असले तरी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे आव्हान काँग्रेसमोर आहे. त्यामुळे काँग्रेसला स्वबळाचा नारा तितकासा परवडणारा नाही, असेही जाणकार सांगत आहे. मात्र, जो पर्यंत काँग्रेस स्वबळावर लढणार नाही, तो पर्यंत काँग्रेसची शहरातील ताकदही वाढणार नसल्याचे काहींचे मत आहे. अशा परिस्थितीत आगामी महानगर पालिकेची निवडणूक ही काँग्रेससाठी आत्मपरिक्षणाची संधी असेल, असेही म्हणावे लागेल.

सध्या जिल्हा काँग्रेसची कमान माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या खांद्यावर आहे. तर शहराची सुत्रे हिशाम उस्मानी सांभाळत आहेत. हे दोन्ही नेते आप-आपल्या पातळीवर चांगले काम करत आहेत. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षातील स्थानिक नेत्यांना एका धाग्यात बांधण्याचे काम दोघांनीही केले आहे. त्यामुळे आगामी काळात महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसची फरफट होणार की काँग्रेसला पुन्हा उभारी घेण्याची संधी मिळणार? हे स्थानिक नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP