औरंगाबादेत घाटीत झालेल्या गैरप्रकाराची मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार; खा. जलील यांचा इशारा

औरंगाबादेत घाटीत झालेल्या गैरप्रकाराची मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार; खा. जलील यांचा इशारा

imtiyaz jaleel

औरंगाबाद : तीन ऑक्सिजन प्लांट बंद करून कोरोना रुग्णांसाठी लिक्विड ऑक्सिजन खरेदीवर घाटी प्रशासनाने दोन महिन्यात एक कोटी रुपये खर्च केले. तसेच एकीकडे रुग्णांसाठी खाटा कमी पडत असताना कोरोना संकटकाळात १८ लाख रुपये खर्चून तयार केलेल्या तीन वॉर्डांना कुलूप लावले. या सर्व प्रकाराबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कोणाचे उखळ पांढरे करण्यासाठी ऑक्सिजन खरेदी केली असा सवाल इम्तियाज यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

ज्या वॉर्डांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. ते वॉर्ड बंद कशामुळे ठेवले, अशी विचारणा डॉ. भागवत कराड यांनी देखील उपस्थित केली आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपेंशी बोलू, असेही त्यांनी सांगितले. कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढल्यावर २०१२ पासून बंद असलेले चार, आठ, नऊ क्रमांकाचे वॉर्ड घाटी प्रशासनाने १८ लाख खर्चून सुरू केले.

याठिकाणी ८० ऑक्सिजन बेड आहेत. या संदर्भात इम्तियाज म्हणाले की, सर्व सोयीसुविधांचे वॉर्ड बंद ठेवणे म्हणजे गैरव्यवस्थापनाचा कळस आहे. गेल्या ५ वर्षांत घाटीला कोट्यवधींचा निधी मिळाला. त्याचे ऑडिट करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. डॉ. कराड म्हणाले की, केंद्र सरकारने लाखो रुपये देऊन ऑक्सिजन प्लांट सुरू केले. ते बंद करून बाहेरून लिक्विड ऑक्सिजन खरेदी चुकीची आहे. कर्मचारी नाही म्हणून वॉर्ड बंद करणेही चुकीचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या