कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार हटविणारच ! – पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीविरुद्ध विरोधी पक्ष एकत्र

कऱ्हाड: आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार हटविणारच आहोत. मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची आघाडी ही समविचारी आणि धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या पक्षांची असेल. त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत. असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. कऱ्हाड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. लोकांना स्वप्ने दाखवित आहेत. मात्र, आता लोकांच्याही सत्य परिस्थिती लक्षात येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीविरुद्ध विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत असे, चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना चव्हाण म्हणाले, ‘फडणवीस यांचे सरकार हे क्लिनचिटचे सरकार आहे. भाजपच्या मंत्र्यांवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांना क्लिनचिट देण्यापलीकडे मुख्यमंत्र्यांनी दुसरे काही केले नाही. त्यामुळे फडणवीस सरकार हे क्लिनचिट देणारे आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.