धक्कादायक : अहमदनगरमध्ये ग्रामसभेत महिलेचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे येथे चक्क ग्रामसभेमध्येच एका महिलेनं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे, महिलेचं नाव छाया बाबासाहेब जरे असे असून ग्रामपंचायतीमधील रेकॉर्डमधील नाव परस्पर कमी केल्याच्या कारणामुळे या महिलेने ग्रामसभेतच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेवर आता सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत. याची पूर्ण चौकशी करण्यात येऊन न्याय मिळावा अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

bagdure

अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकाराने प्रशासन चांगलेच हादरले आहे. या महिलेने प्रथम ग्रामसेवकाच्या अंगावर शाईफेक करत विषप्राशन केले, मात्र भर ग्रामसभेत एवढी माणसे असताना तिला कोणीही अडविण्याचा प्रयत्न केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून नाव रेकॉर्ड मधून कमी केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे छाया जरे यांनी यापूर्वी केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने व्यथित होऊन हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता याप्रकारामुळे प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला असून सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याचे दिसत आहे. यावर आता काही कारवाई होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

You might also like
Comments
Loading...