थकित वीज बिलासाठी नगर जिल्ह्यातील ७५ पाणी योजनांचा वीज पुरवठा तोडला

electric-tower-

अहमदनगर : नगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरण वीज कंपनीने जिल्ह्यातील तब्बल ७५ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई केली आहे.कारवाई नंतर जर तातडीने थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर संबंधित पाणी योजनांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे.महावितरणच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

गावा-गावांमध्ये जनतेला शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगर जिल्ह्यात सुमारे १ हजार ५८८ पाणी योजना कार्यान्वित आहेत. संबंधित गांवाचे सरपंच व ग्रामसेवक या पाणी योजनांचे नियंत्रण करीत असतात.जिल्ह्यातील पाणी पुरवठा योडनांकडून महावितरण वीज कंपनीला ४० कोटी रूपयांची वीज बिलाची थकबाकी आहे.या दीड हजार योजनांपैकी केवळ ४२५ योजनांकडून वीज बिलाची रक्कम नियमितपणे जमा केली जाती.उर्वरित सर्व पाणी पुरवठा योजनांकडे वीज बिलाची थकबाकी आहे.

महावितरण कंपनीने वीज बिलाच्या १२ करोड रूपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी सुमारे ५७९ पाणी योजनांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे.तसेच वारंवार मागणी करूनही वीज बिलाची रक्कम जमा न करणार्या योजनांच्या विरूध्द महावितरण वीज कंपनी ने एखेरीस कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.महावितरण ने जिल्ह्यातील ७५ पाणी योजनांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी तोडण्याची कारवाई केली आहे.थकबकीची रक्कम तातडीने जमा झाली नाही तर या पाणी योजनांची जप्ती करण्याचा इशारा ही महावितरण कंपनी ने दिला आहे.