२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेची सूत्रे प्रादेशिक पक्षांच्या हाती असतील – चंद्राबाबू नायडू

हैदराबाद : काही दिवसांपूर्वी भाजपला पाठिंबा देणाऱ्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता भाजप विरोधी भूमिका घेतली असून, त्यांनी २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याचे आव्हान केले आहे. तसेच २०१९ साली सत्तेची सूत्रे ही प्रादेशिक पक्षांच्या हाती असतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ते एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना नायडू म्हणाले की, माझा नोटाबंदीला पाठींबा होता. कारण मला त्यावेळी वाटलं होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे योग्य असेल. मात्र, मोदी सरकारच्या या निर्णयामुळे बँका दिवाळखोरीत निघाल्या. लोकांचा बँकिंग क्षेत्रावरुन विश्वास उडाला. यापूर्वी आपण कधीही चलन पुरवठ्यातील घट पाहिली नव्हती. दरम्यान दुसरीकडे सर्व विरोधक भाजपच्या विरोधात एकवटल्याचं चित्र आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्याला सर्व विरोधकांनी एकत्र येत शक्ती प्रदर्शन केलं होतं.