मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : इम्तियाज जलील ध्वजारोहणाला गैरहजर

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला गैरहजर होते. याआधीच इम्तियाज जलील ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? यावरून सोशल मिडियावर वॉर सुरू झाले होते. आमदार असतांना पाच वर्षातील एकाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहीले नव्हते आणि आता खासदार झाल्यावरही त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली आहे.

याआधीच इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने दरवेळी हा वाद उकरून काढणे निरर्थक आहे. माझा आणि रझाकारांचा काय संबंध? परंतु मी जेव्हा काही चांगल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा प्रकारचे वाद उकरून काढले जातात. मुक्तीसंग्राम दिन आणि त्यासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांबद्दल मला देखील नितांत आदर आहे. पण काही कारणांमुळे मी जर सोहळ्याला हजर राहू शकलो नाही तर त्याचा चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही असं विधान केले होते.

तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आहे, मी एमआयएमचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. राज्यातील मुलाखती आणि बैठकांचे नियोजन करतांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची आठवण राहीली नाही. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानूसार मी आज रात्रीच मुंबईला जाणार आहे. तिथे रात्री उशीरापर्यंत बैठका आणि उद्या इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहे. त्यामुळे पुन्हा माझ्या अनुपस्थितीवरून कुणी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले होते.

दरम्यान, सोशल मिडीयावर ट्रोल झाल्यानंतर ‘माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरुन कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करु नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता दिसून येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही असं जलील यांनी म्हटले आहे.