इम्रान खान करणार मोदींना फोन, तणाव निवळण्यासाठी चर्चा करणार

टीम महाराष्ट्र देशा- भारताकडून रणनीतिक आणि कुटनीतिक स्तरावर वाढवण्यात येणाऱ्या दबावामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनएन न्यूज 18 ने दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करण्याच्या तयारीत असून, दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चा करणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका करण्यात येईल, अशी माहिती पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. इम्रान यांनी पाकिस्तान संसदेत या बद्दलची माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारताच्या कुटनीतीचा विजय झाल्याच मानलं जात आहे.

पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडले असून दोन्ही देशात पुन्हा शांतता आणि चर्चा सुरु व्हावी यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याचं इम्रान खान यांनी सांगितले आहे. कालपासून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे कळताच देशाच्या सामाजिक स्तरातून अभिनंदनला भारतात आणा अशी मागणी होत आहे.तर ट्विटरवर #BringBackAbhinandan ट्रेंड होत आहे. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील अभिनंदन वर्धमानला भारतात आणण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकणं सुरु केलं आहे.