Share

‘या’ गोष्टींचा उपयोग करून दुग्धजन्य जनावरांचे सुधारा आरोग्य

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा शेतीप्रधान देश असला तरी पशुपालन हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. शेतीबरोबरच पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करते. शेतकऱ्यांना पशु व्यवसाय करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये प्रामुख्याने जनावरांच्या आरोग्य संबंधित आव्हानांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. दुग्ध व्यवसाय हा पशुपालनामधील प्रमुख व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय करत असताना शेतकऱ्याला गाय, म्हैस, मेंढी, शेळ्या इत्यादी दुग्धजन्य जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. या जनावरांमध्ये वाढत्या रोगाच्या धोक्यामुळे दुग्ध उत्पादनात कमतरता निर्माण होते.

चाऱ्याच्या कमतरतेमुळे या जनावरांना योग्य पोषण मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पशुतज्ञ त्या जनावरांना काही खास घरगुती गोष्टी खाऊ घालण्याचे सल्ले देतात जेणेकरून त्या जनावरांचे आरोग्य चांगले राहते. आणि त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असते. या घरगुती खाद्यपदार्थांमध्ये मीठ आणि मोहरीच्या तेलाचा समावेश होतो.

दुग्धजन्य जनावरांना मोहरीचे तेल देण्याचे फायदे

बदलत्या हवामानामुळे देशात जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत जनावरांना फक्त कोरडा चारा देऊन काम भागत नाही. कोरड्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये आजार निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर दुधामध्ये देखील घट होऊ शकते. म्हणूनच कोरड्या चाऱ्यासोबत मोहरीचे तेल किंवा मोहरीची पेंडी जनावरांना खायला द्यायचा सल्ला तज्ञ देतात. मोहरीच्या तेलामध्ये उपलब्ध असलेली चरबी प्राण्यांच्या शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते.

विशेषता गाभण जनावरांसाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर असते. मोहरीच्या तेलामुळे लहान जनावरांचा विकास चांगला होतो. पशु तज्ञांचा मते मोहरीचे तेल जनावरांना रोज देऊ नये, पण जनावर आजारी असताना किंवा त्यांच्यामध्ये ऊर्जेची कमतरता असताना तुम्ही 100 ते 200 मिली मोहरीचे तेल त्यांना देऊ शकता. यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर प्राण्यांची प्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत होते.

जनावरांना मीठ खायला देण्याचे फायदे

मानवी शरीरात मिठाची कमतरता निर्माण झाल्यावर जशा समस्या निर्माण होतात साहजिकच तशाच  समस्या जनावरांमध्ये देखील निर्माण होतात. आयरन, आयोडीन, कॉपर, मॅग्नेशियम, मॅग्नीज, सोडियम इत्यादी गोष्टींची कमतरता मानवी शरीराबरोबरच प्राण्यांच्या शरीरालाही हानी पोहचवू शकते. त्याचा थेट प्राण्यांच्या प्रतिकारशक्ती वर परिणाम होऊन त्यांच्यासाठी अनेक आजारांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मिठाच्या कमतरतेमुळे कधी कधी जनावरांचे दूध उत्पादन देखील कमी होते. मिठाच्या कमतरतेमुळे अनेक वेळा गायी आणि म्हशींचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे जनावरांना हिरव्या किंवा कोरड्या चारा सोबत मीठ द्यावे मिठामुळे जनावरांची पचन संस्था सुदृढ होते आणि त्यांची भूकही वाढते. प्राण्यांची भूक वाढल्यामुळे जनावरे संतुलित प्रमाणात पशुखाद्य खाता आणि त्यांची दूध देण्याची क्षमताही वाढते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा शेतीप्रधान देश असला तरी पशुपालन हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. …

पुढे वाचा

Agriculture