महत्त्वाची बातमी! ‘राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होणार’, अशोक चव्हाणांचे सुतोवाच

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, आ. सतीश चव्हाण. ‘मसाप’च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे इत्यादींची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी चव्हाण म्हणाले, साहित्यावर अधिकार वाणीने बोलण्याचा अधिकार नाही. मात्र, साहित्य चळवळ रुजली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी राजकीय व्यक्तींनी सहकार्य केले पाहिजे. मराठवाड्याचा सर्व विभागात अनुशेष आहे. पण साहित्यात मराठवाडा पुढारलेला आहे. राज्याचे पहिले सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा योग माझ्याच कार्यकाळात आला. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा साहित्य, कला, संस्कृती याविषयी आस्था बाळगून आहेत. त्यामुळे सर्वांनी सोबत घेऊन विशेष बैठकीत साहित्य चळवळीचे प्रश्न मांडू. कृती आराखडा तयार करून प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे. गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे अशी भूमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे, असे वक्तव्य मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या