प्रदेशाध्यक्ष होताच थोरात ‘अॅक्शन मोड’मध्ये १८ तारखेला कॉंग्रेसची महत्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र कॉंग्रेस आता चांगलीच कामाला लागली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात , प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व सर्व नवनियुक्त कार्याध्यक्ष ह्यांच्या उपस्थितीमध्ये दि.18 जुलै रोजी मुंबई येथे राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीत होणाऱ्या वाटाघाताबाबतीत चर्चा होणार असून आगामी निवडणुकीची रणनीती देखील ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसने अखेर पक्ष संघटनेवर लक्ष दिल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली बाळासाहेब थोरात यांची निवड त्याचेच संकेत देत आहेत. प्रदेश कॉंग्रेसच्या समितीत थोरात यांच्या बरोबरीने नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली असल्याने सामूहिक नेतृत्वावर भर देण्याचा पक्षाचा प्रयत्नही दिसतो आणि सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्याचा कलही लक्षात येतो.

तर थोरात यांच्या या निवडीचा आणखी एक पदर आहे, कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आणि 4 वर्षे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद पटकावल्याने त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून कॉंग्रेसने पक्षनिष्ठेचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर थोरात यांच्यावर मोठी जबाबदारीही टाकली आहे. विखे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान केले होते. आता राज्यातील पक्षाची धुरा स्वीकारल्यानंतर पक्षातील हे आउटगोइंग थांबवण्याचे मोठे आव्हान थोरात यांना पेलावे लागणार आहे.