औरंगाबादेत स्मार्ट सिटीची महत्वपूर्ण बैठक; ‘या’ कामांना दिली मंजूरी!

smart city

औरंगाबाद : शहरातील जालना रोड, व्हीआयपी रोड आणि जळगाव रोड या तीन रस्त्यांवर संपूर्णपणे प्रकाशित २५ स्मार्ट सिग्नल बसविण्यास आणि शहरातील व्यावसायिक नळ कनेक्शनला मीटर बसविण्यास स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या दोन्ही कामांवर १४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

स्मार्ट सिटीचे मेंटॉर तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव बलदेवसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीला पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह स्मार्ट सिटीचे इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सादरीकरण केले.

पहिल्या टप्प्यात शहरातील व्यावसायिक नळांना वॉटर मीटर बसविले जाणार आहेत. त्यासाठी १३ कोटी १६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकास बैठकीत मंजुरी देण्यात आली. लवकरच पाच इलेक्ट्रिक कारची खरेदी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसाठी पाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास तातडीने मंजुरी देण्यात आली. ८१ लाख रुपये खर्चून पाच नेक्सॉन इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या जाणार आहेत.

स्मार्ट सिटीत महापालिकेला अडीचशे कोटींचा हिस्सा टाकायचा आहे. हा निधी स्मार्ट रोड, स्मार्ट स्कूल आणि स्मार्ट हेल्थ साठी वापरण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासकांनी ठेवला. सिडको बसस्थानक चौक ते हसूल पॉईंट या तीन रस्त्यांवर २५ स्मार्ट सिग्नल बसविण्याच्या ७९ लाख रुपयांच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या ऑफिसवर सोलार पॉवर प्लांट बसविणे, संत एकनाथ रंगमंदिराचे स्टेज आणि लाईटींग, लाईट हाऊस प्रकल्प आदींच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या