संजय राऊतांची महत्त्वाची घोषणा! ‘गोवा, युपीतही महाविकास आघाडीचा प्रयोग’

संजय राऊतांची महत्त्वाची घोषणा! ‘गोवा, युपीतही महाविकास आघाडीचा प्रयोग’

sanjay raut

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. या विचित्र आघाडीमुळे शिवसेनेसह इतर दोन पक्षांवर लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, केवळ सत्तेसाठी स्थापन झालेला हा प्रयोग आता इतर राज्यातही करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग आता शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशातही करणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. शिवाय गोवा राज्यात २० तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ८० ते १०० जागा लढवणार असल्याचे ते म्हणाले.

‘गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात २० ते २१ जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही ८० ते १०० जागा लढवू. तसेच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो.’

‘उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितले. मात्र, गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील शिवसेनेने तेथील २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तसे पत्रकच स्थानिक नेत्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी काढले होते. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून होणाऱ्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे की, शिवसेना उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

शिवसेनेचा हा निर्णय निवडणुकीत भाजपसाठी अडचणी वाढवू शकतो. उत्तर प्रदेशच्या विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत शिवसेना नेत्यांनी आरोप लावलाय की, भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. राज्यात बहिणी, मुली कोणीही सुरक्षित नाही. तर जनता बेरोजगारी आणि महागाईनं त्रस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या