fbpx

भाजपला मुंडे साहेबांचा फोटोसुद्धा वापरू देणार नाही , मुंडे समर्थक आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : “गेल्या चार वर्षात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला मुहूर्त भाजप सरकारला सापडला नाही. भाजपला गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडला आहे. औरंगाबाद येथे राज्य सरकारने मुंडे यांचं स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. हे स्मारक बांधा अन्यथा आत्मदहन करु, तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात गोपीनाथ मुंडे यांच फोटो आणि नाव देखील वापरू देणार नाही ” असा इशारा भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी दिलाय.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला 100 कोटींचा निधी दिल्यानंतर आता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं काय असा प्रश्न जय भगवान महासंघाने विचारला आहे. चार वर्ष स्मारक रखडलं आहे. मंत्री असताना एकनाथ खडसेंनी जागा उपलब्ध करुन दिली. पण स्मारक झालं नाही.

एक महिन्यात काम करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा बाळासाहेब सानप यांनी दिला. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात गोपीनाथ मुंडे यांच फोटो आणि नाव वापरू देणार नाही, असाही इशारा बाळासाहेब सानप यांनी दिलाय.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री असताना फेब्रुवारी 2015 मध्ये स्मारकाची घोषणा केली होती. शहरातील हॉटेल अमरप्रीतच्या समोरच्या बाजूला शासकीय दूध डेअरीला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागेत हे स्मारक केलं जाणार होतं. याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल, असंही खडसे म्हणाले होते.

सरकारच्या सहा एकर जागेपैकी दोन एकर जागेत हे स्मारक उभे करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार होता. त्याच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचंही खडसेंनी सांगितलं होतं. तीन महिन्यांत हा आराखडा तयार होणार असून तेथे एक उद्यानही व्हावे, असा प्रयत्न असल्याचं चार वर्षांपूर्वी खडसे म्हणाले होते.

या उद्यानात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि पुस्तकांचे संग्रहालय, त्यांनी लिहिलेले लेख येथे ठेवले जाणार होते. मुंडेंच्या आयुष्यावरील लघुपट दाखवण्यासाठी 100 आसनक्षमतेचं एम्पी थिएटरही उभारलं जाणार असल्याचं सांगितलं होतं.