संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा – राष्ट्रवादी

sabhaji bhide and ncp logo

नागपूर  – संभाजी भिडे यांच्या अटकेमध्ये सरकार चालढकलपणा करत असल्याने विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकुब करावे लागले मात्र त्यानंतरही संभाजी भिडे आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सभागृह दणाणून सोडले.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडयातील तिसरा दिवस असून सकाळच्या सत्रात सभागृहामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राईनपाडा हत्याकांडवरुन सरकारवर शरसंधान साधले तर दुसरीकडे दुपारच्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी संभाजी भिडे याच्या अटकेची मागणी लावून धरली. संभाजी भिडे यांच्यावर भीमा कोरेगाव दंगलीचा आरोप आहे. शिवाय त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी त्यांना तात्काळ अटक करा यासाठी आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

तर विनाअनुदानित शिक्षक आपल्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये आंदोलन करत असून त्यांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष देवून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात लावून धरली.

मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना ‘क्लीनचीट’; भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही