कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा – खा. अशोक चव्हाण

congress state president ashok chavan

मुंबई : राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील मागणी राज्य शासनाकडे प्रलंबीत आहे.

या सदर्भात वेळोवेळी कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी मागण्या केलेल्या आहेत. नुकतेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात मागणी केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्ष त्रिपूरात सत्तेत आल्यास तेथील शासकीय कर्मचा-यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

एका राज्यात निवडणुका जिंकल्यावर तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करण्याची भूमिका तर दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता असतानाही चालढकल करण्याची भूमिका का? राज्यातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू केला पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.