Imtiyaz Jaleel । औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याच्या आधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत करण्यात आले. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्यामुळे या निर्णयाला अनेक राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शवला. आता मात्र ‘एआयएमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत या निर्णयाचा विरोध केला आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही काही औरंगजेबाचे भक्त नाही, मात्र औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा घाट हा मोठी शिवसेना, लहान शिवसेना आणि भाजप यांनी घातला आहे, मात्र या निर्णयामध्ये औरंगाबादकरांचे मत लक्षात घेण्यात आलेले नाही. प्रत्येक शहराची स्वतःची एक ओळख असते. त्यामुळे हा औरंगाबादकरांच्या जिवाभावाचा प्रश्न आहे. केवळ मुस्लिम नागरिकांनीच नव्हे तर इतर धर्मियांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधत या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यामुळे नागरिकांना नामांतर हवे कि नको या मुद्यावर राज्य सरकारने निवडणूक घ्यावी त्यात जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल.
पुढे बोलताना जलील असेही म्हणाले कि, “औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यास पासपोर्ट, आधारकार्ड अश्या सर्व कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतील. तसेच शैक्षणिक कागदपत्रांमध्येही बदल करावे लागतील. त्याचा खर्च उद्धव ठाकरे देणार आहेत का? कि देवेंद्र फडणवीस देणार आहेत?” असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेना, भाजप यांच्या वतीने औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना धमक्या देण्यात येत असून आम्ही मात्र त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही असा इशारा जलील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
नामांतराला विरोध दर्शविण्यासाठी एका मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत. यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच या मूक मोर्चामध्ये मी खासदार म्हणून नाही तर औरंगाबादचा एक सामान्य नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<