fbpx

मावळमधील पराभवाची जबाबदारी माझी : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. तसेच या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच पवार घराण्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली यात श्रीरंग बारणे यांनी विजय मिळवला आहे. यावर भाष्य करताना माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी “मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही चर्चा केली” अशा शब्दात मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला ४८ पैकी फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या दोन्हीही पक्षांनी लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून राज्यतील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे