‘मुश्रीफ यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही’

samarjeet ghatage vs mushrif

कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते समरजीत घाटगे यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते,’ असं भाष्य मुश्रीफ यांनी केलं होतं.

आता मुश्रीफ यांना समरजीत घाटगे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘सर्व सामान्य जनतेप्रमाणेच मलाही सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप प्रसारमाध्यमांमधूनच समजले. त्यामुळे मुश्रीफ यांच्या बाबतीत सोमय्या यांना माहिती पुरवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेले माझे नाव म्हणजे मुश्रीफांच्या राजकारणाचा तो एक भाग आहे. असे राजकारण करण्याचे संस्कार आमचे नाहीत आणि ते यापुढे ही असणार नाहीत,’ असं घाटगे म्हणाले.

यासोबतच, ‘आमचे नाव घेऊन या विषयाला त्यांनी राजकीय वळण देऊ नये. खासदार सोमय्या यांच्यासह संबंधित तपास यंत्रणेला थेट उत्तर द्यावे. या प्रकरणांमध्ये माझा काडीचाही संबंध नसताना त्यांनी माझे नाव घेतले आहे. याचा अर्थ माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही. मुश्रीफांच्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस व स्व विक्रमसिंह राजे घाटगे यांचा मी चिरंजीव आहे. आणि जर घाबरत असतो तर अपक्ष म्हणून निवडणूक तुमच्या विरोधात लढलो नसतो. जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला ९० हजार मते मिळाली. या बाबत सुद्धा जनताच त्यांना उत्तर देईल,’ असा घणाघात घाटगे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या