शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत पैठण शहरात अवैध प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत

पैठण : पैठण शहराच्या हद्दीत तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात एनए-४४ व गुंठेवारीची परवानगी असल्याचे प्रलोभन दाखवून व नागरिकांना मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या प्लॉटिंगचा व्यवसाय राजरोसपणे सर्व नियम धाब्यावर बसून सुरू आहे. या मुळे दररोज शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या प्लॉटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मनमानी प्रमाणे सुरू असून प्रशासनातीलच अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हा गोरख धंदा तेजीत सुरू असल्याचे दिसत आहे.

एनए-४४ प्लॉटिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दखल घेऊन पैठण शहर व तालुक्यात ग्रामीण भागात अवैधरित्या सुरू असलेल्या प्लॉटिंग खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. पैठण तालुक्यात देवस्थानच्या जमिनी, इनामी जमिनी, खाजगी जमिनीवर, शासनाच्या विविध जमिनीची सर्रासपणे प्लॉटिंग पाडून विक्री करण्यात येत आहे. वास्तविक पाहता शासनाच्या विविध विभागांची परवानगी घेऊनच प्लॉटचे लेआउट करून जागा ठरविणे बंधनकारक असते.

दिवसेंदिवस या प्लाॅट व जमिन विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात धनदांडगे उतरलेले दिसत आहेत. तालुक्यात दोन ते तीन वर्षात बोटावर मोजण्या इतकेच प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. पैठण शहरात व लगत मोजक्याच साईटचे एनए झाले असून अवैधरित्या शासकीय जमिनीचे, इनामी जमिनी, देवस्थानच्या जमिनी, यांच्या अवैधरित्या खरेदी-विक्री, गहान खत, ९९ वर्षाचे करार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

पैठण- औरंगाबाद रोडवर चितेगाव,फारोळा,बिडकिन परिसर, बिडकीन -निलजगाव रोड, बिडकीन- शेकटा रोड, बिडकीन-रांजणगाव रोड ढोरकीन परिसर , ढोरकीन – ढाकेफळ , लोहगाव रोडवर, ईसारवाडी, धनगाव, पैठण एमआयडीसी, पिंपळवाडी, कातपुर, पावन गणपती परिसर राम मंदिर परिसर, गोलनाका आदी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॉट विक्रीचे व्यवहार विना परवानगी सुरू आहेत. याकडे महसूल, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP