वाळूज एमआयडीसी परिसरात अवैध दारू विक्री जोरात, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आळा बसावा यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त तथा पोलीस उपसंचालक निखिल गुप्ता यांनी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची वाळूज पोलीस ठाण्यातुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली केली. परंतु मागील काही दिवसापासून वाढत असलेले अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षकांना यश आले नसल्याने आयुक्तांच्या विश्वासावर पोलीस निरीक्षक खरे उतरतील का ? यावर सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

मागील काही दिवसापासून वाळूज एमआयडीसी परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला कारण म्हणजे परिसरात सुरु असलेले अवैध धंदे व नशेखोरी. एमआयडीसी परिसरातील प्रत्येक चौकात आणि गावात अवैध देशी आणि विदेशी दारू विना परवाना सहज शक्य उपलब्ध होत असल्याने सकाळपासूनच दारुड्यांची याठिकाणी महफिल जमलेली असते. या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच फावत आहे. याला स्थानिक प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांची अर्थपूर्ण साथ असल्याने सर्वाना माहिती असून सुद्धा कारवाई करताना डोळेझाक करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आता दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक गुरमे यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

एमआयडीसी परिसरातील चारही वाईन शॉप जवळ होत असलेल्या टपऱ्यावरील गर्दीने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. तर याठिकाणी भांडणे देखील मोठ्या प्रमाणावर होत होत. त्यामुळे काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक गुरमे यांनी वाईन शॉप जवळील सर्व अतिक्रमित टपऱ्या क्रेनच्या सहाय्यांने फेकून दिल्या होत्या. पुढील दोन तीन दिवस या ठिकाणी गर्दी झाली नाही परंतु कारवाई थंड बस्त्यात पडताच पुन्हा एकदा या टपरीवाल्यानी वाईन शॉप जवळ पाणी बॉटल, ग्लास, चखणा आदी विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळॆ याठिकाणी पुन्हा एकदा गर्दी सुरु झाली असून पुढे पाठ मागे सरसपाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच निरीक्षक गुरमे यांनी पोलीस ठाण्याचे चित्रच बदलून टाकले. याठिकाणी वर्षानुवर्षे पडून असलेल्या परिसराची स्वच्छता केली. त्यामुळे पोलीस ठाण्याचे रूपच बदलून गेले आहे. ठाण्याची तर स्वच्छता झाली आता परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांची देखील स्वच्छता करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या