सांगोला येथे अवैध गर्भपात; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा

सोलापूर- न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम सांगोला येथील डॉ. सुहास जाधव व डॉ. अश्‍विनी जाधवर यांनी एप्रिल 2017 ते 7 फेब्रुवारी 2018 या कालावधीत 6 गर्भवती स्त्रियांचे एमपीटी अ‍ॅक्ट 1971 मधील तरतुदीचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गर्भपात करून गर्भाची अज्ञात ठिकाणी विल्हेवाट लावल्याने त्यांच्याविरुद्ध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी गुन्हा दाखल केला.

गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी शहरातील डॉ. जाधव यांच्या न्यू धनश्री हॉस्पिटल येथे बेकायदेशीर गर्भपात केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार बुधवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीची खातर जमा करण्यासाठी विधी समुपदेशक रामेश्‍वरी माने व सिव्हिल हॉस्पिटल येथील कक्ष सेवक हनीफ शेख यांच्यासह नायब तहसीलदार, सपोनि अमुल कादबाने, नगरपरिषद अभियंता अभिजित ताम्हाणे, हरिचंद्र जाधव (तलाठी) आदींना बरोबर घेऊन या हॉस्पिटलवर छापा टाकला, असता एप्रिल 2017 ते 7 फेब्रुवारी 2018 पर्यंत 6 महिलांचे गर्भपात केल्याचे आढळून आले.

यावेळी पथकाने हॉस्पिटलमधील कागदपत्रे व रजिस्टरची पाहणी केली असता अनेक तफावत व गंभीर त्रुटी आढळून आल्या. पथकाने हॉस्पिटलमधील सर्व कागदपत्रे पंचनामा करून जप्त केली आहेत, तर ऑपरेशन थिएटर व प्रसूतिगृह सील केले. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप बेलपत्रे यांनी डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्‍विनी जाधवर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. तपास सपोनि किरण उंदरे करीत आहेत