‘लॉकडाऊन करायचे असेल तर पूर्ण करा, वेळेचे बंधन नको’

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नागरिकांना आवाहन करूनही नियमांचे पालन होत नाहीये. त्यामुळे नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. परंतू अद्यापपर्यंत लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाहीये. मात्र, लॉकडाऊन होणार हे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी संभाव्य लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हॉटेल व्यावसायिक आकाश कमलानी म्हणाले की, ”कोरोना संकट आणि गेल्यावर्षीच्या संकटातून हॉटेल व्यावसायिक अजूनही सावरलेले नाहीयेत. त्यातच पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाला लॉकडाऊन करायचं असेल तर पूर्णपणे करावे. त्यामध्ये वेळेचे बंधन ठेऊ नये. पूर्णपणे लॉकडाऊन राबवल्यास कोरोना विषाणू पसरण्यापासून थांबवला जाऊ शकतो अशी अपेक्षा कमलानी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे अनेक व्यवसायांवर त्याचा परिणाम बघायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायांवर होताना दिसतोय.

व्यावसायिकांचे पाय अजूनही खोलातच

औरंगाबाद जिल्हा हॉटेल रेस्टोरंट मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शहरात लहानमोठे एकूण ४०० हॉटेल्स आहेत. त्यात १२ ते १५ हजार खोल्या आहेत. पण आज त्यातील ८० टक्के खोल्या रिकाम्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्याचा फटका पर्यटन उद्योगाला बसतोय आणि पर्यायाने तो हॉटेल व्यवसायावर होत आहे.

तसेच व्यवसाय बंद, उत्पन्न तर नाहीच शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन, मेन्टेनेन्सचा खर्च, विविध कर इत्यादी गोष्टी पाहता व्यावसायिकांचे पाय अजूनही खोलातच आहेत. आता ते बाहेर निघण्याची आशा होती. मात्र, कोरोना रुग्ण नव्याने वाढत असल्याने त्यावरही पाणी फिरते की काय अशी परिस्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या