जगावे तर कर्नाटकात, मरावे तर कर्नाटकात! मग दादा तुम्ही महाराष्ट्रात कशाला आलात- अजित पवार

मूरगुड: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलना दरम्यान सरकारला चांगलेच फटकारले आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसने हल्लाबोल आंदोलनाचे हत्यार पुन्हा एकदा उपसले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करतांना अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील तिथे कर्नाटकात जाऊन कन्नडमध्ये म्हणतात की जगावे तर कर्नाटकात, मरावे तर कर्नाटकात. चंद्रकांत दादा, मग तुम्ही महाराष्ट्रात कशाला आलात? बेळगाव, हा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, अशावेळी असे बेभान वक्तव्य शोभत नाही.

अजित पवार यांनी सरकारवर देखील टीकास्त्र सोडले, या सरकारने उंदिर मारण्यातही भ्रष्टाचार केल्याचं खुद्द माजी मंत्री एकनाथ खडसेच सांगतात. हे सरकार लोकांचे मूळ प्रश्न बाजूला ठेऊन भलत्याच मुद्द्यावर चर्चा करते. श्रीदेवीवर प्रचंड चर्चा केली मात्र शेतकरी मरतोय त्याकडे लक्ष दिले जात नाही. अश्या शब्दात पवारांनी सरकारवर ताशेरे ओढले.

अजित पवार पुढे म्हणाले, नाशिकवरून शेतकरी पायी चालत आले. त्यांचे पाय जखमी झाले पण सरकार ढिम्म आहे. या शेतकऱ्यांना सरकारने दिले फक्त आश्वासन. या सरकारला खड्यासारखं बाजूला करायला हवं. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारची ही दादागिरी पटणारी नाही. महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवक, व्यापारी, कामगार, मागासवर्गीय, अल्पसंख्याक कोणताच घटक समाधानी नाही. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाही. सरकार कुणाला पाठिशी घालत आहे.

You might also like
Comments
Loading...