‘महाराष्ट्राची परंपरा आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिले नाही?’, चंद्रकांतदादांचा काँग्रेसला सवाल

‘महाराष्ट्राची परंपरा आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिले नाही?’, चंद्रकांतदादांचा काँग्रेसला सवाल

मुंबई : राज्यसभेचे खा. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. ती बिनबिरोध व्हावी अशी काँग्रेसची भूमिका होती. मात्र, तरीही भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी देऊन अर्ज दाखल केला.

भाजपने उमेदवार देऊ नये याकरिता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यातील प्रथा-परंपरेची आठवण करून दिली होती. त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची आठवण करून दिली.

‘भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. मात्र, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. साधारणपणे एखाद्या नेत्याचे निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे. वेळप्रसंगी आम्ही भाजपला उमेदवार न देण्याबाबत विनंतीही करू, असे थोरात म्हणाले होते.

थोरात यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती असे पाटील म्हणाले. तसेच काँग्रेसने रजनी पाटलांना तिकीट दिले आहे. त्यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहे. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या