आड आला तर ! छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन- उद्धव ठाकरे

गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही

मुंबईः भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन नानिमित्त आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून आम्ही राजकारणाचं बाळकडू घेतलंय. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडायचं की सोबत राहायचं, हे आम्हाला कुणी शिकवू नये.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल
  • माझी मुंबई १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मिळवली, त्या मुंबईतून सगळं हलवत आहे. मुंबईला मारून टाकण्याचं काम चाललं आहे
  • फक्त गायीला वाचवणं हा हिंदू धर्म नाही तर औरंगजेब सारख्या शहीद सैनिकाला मुजरा करणं हे हिंदुत्व
  • जम्मू काश्मीरचं सरकार नालायक आहे हे कळायला तीन वर्ष आणि ६०० सैनिकांचे बळी का जावे लागतात?
  • ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखां विरोधात राजकारण केलं त्यांना राजकारणात आडवं कसं करायचं ते मी दाखवून देतो
  • पाकड्यांसमोर शरण न जाता मरण पत्करलं त्याला आम्ही मुजरा करतो
  • गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही. अशी तडजोड मी केली तर शिवराय आणि शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाहीत