‘तुम्ही ऐकलं नाहीत, तर परिस्थिती बिकट होईल’, कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेक नेते त्यांच्यापासून दूर जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. तर, राजीव सातव यांचे आकस्मिक निधन झाल्याने राहुल गांधी यांनी अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी गमावला. आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जितिन प्रसाद यांच्यावर नाराजी व्यक्त केली. “जितिन प्रसाद यांनी जे केलं, त्याच्या विरुद्ध मी नाहीयेय. त्यांच्याकडे त्यासाठी वाजवी कारण देखील असू शकेल. पण भाजपामध्ये प्रवेश करणं हे मी समजू शकत नाही. आपण आयाराम गयाराम राजकारणापासून आता ‘प्रसादा’च्या राजकारणाकडे वळू लागल्याचं हे प्रतिक आहे. जिथे प्रसाद मिळेल, तो पक्ष तुम्ही जवळ करणार.

तसेच सिब्बल यांनी आपल्याच पक्षाला सूचक इशारा दिला आहे. “दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल”, असं कपिल सिब्बल म्हणालेत.

यावेळी कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षपणे कान टोचलेत, ‘मला खात्री आहे की नेतृत्वाला हे माहितीये की नेमकी समस्या काय आहे. माझी आशा आहे की नेतृत्व लोकांचं ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचं निराकरण केलं गेलं नाही हे खरं आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे.

आम्ही सातत्याने या अडचणींविषयी सांगत राहू. काँग्रेसनं पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवं. त्यासाठी आपल्याला पुनर्रचना करणं आवश्यक आहे. जर प्रमुखाने ऐकणंच सोडून दिलं, तर संघटना कोसळेल. आम्हाला फक्त इतकंच हवं आहे की पक्षानं आमचं ऐकावं”, असं सिब्बल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

IMP