तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास संपूर्ण रस्ताच खोदणार – आ. आव्हाड

ठाणे : ठाणे शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. या खड्डयामधूनच गणरायाचे आगमन होणार आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही न केल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा रेतीबंदर येथील विसर्जन घाटासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून महाआरती केली.

दरम्यान, आगामी तीन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाहीत; तर उरलेला रस्ताही खोदून टाकू, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला. ठाणे शहरात सध्या रस्ते कमी आणि खड्डे अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. मात्र , पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याने खड्डे चुकवतच गणेशभक्तांना गणरायाला घरी आणावे लागत आहे. किमान विसर्जनासाठी तरी रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे आंदोलन केले.

रेतीबंदर विर्सजन घाटासमोर असलेल्या रस्त्यावाव्रील खड्ड्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गणपतीची मूर्ती घेऊन ठाण मांडले . तसेच, या ठिकाणी महाआरती करून ठामपाला खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना केली . या आंदोलनात आ. आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अभिजित पवार, नगरसेविका वर्षा मोरे , महेश साळवी , आरती गायकवाड, जितेंद्र पाटील, मोरेश्वर किणे, अनिता किणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगर पालिका प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला. ठाणे महानगर पालीकेने गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी रस्ते दुरुस्त करणे गरजेचे असतानाही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता विसर्जनाच्या आधी तरी रस्ते दुरुस्त करावेत, रेतीबंदर विसर्जन घाटावर मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. या ठिकाणी असलेले खड्डे त्वरित बुजवावेत; अन्यथा तीन दिवसात आम्ही उरलेला रस्ता खोदून टाकू, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

दरम्यान , ठाणे महानगर पालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी राखीव ठेवला आहे. तरीही रस्त्यात खड्डे कायम असतील तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल करून राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी , या रस्त्यांची दुरुसती तत्काळ करावी, अशी मागणी केली.