‘तुम्ही ‘गरबा’ कराल, तर आम्हालाही ‘झिंगाट’ दाखवावा लागेल’, मनसेचा अदानींना इशारा

मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) देण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या (मिआल) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

दरम्यान, विमानतळाचे व्यवस्थापन ताब्यात आल्यानंतर अदानी समुहाच्या कर्मचाऱ्यांनी विमानतळावर नृत्य केले. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसमोरच गरबा करत आनंद साजरा केला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा प्रकार पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई संतप्त झाले आहेत. त्यांनी अदानी यांना इशारा दिला आहे. तुम्ही ‘गरबा’ कराल, तर आम्हालाही ‘झिंगाट’ दाखवावा लागेल असे ते म्हणालेत.

‘फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय. विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल असा इशारा सरदेसाई यांनी अदानी यांना दिला आहे.

तसेच काही दिवसांपूर्ली ‘मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या’ असा इशारा मनसे नेते सरदेसाई यांनी दिला होता. अदानी समुह आणि मनसे यांच्यात नेहमी विविध कारणांवरून खटके उडत आहेत. त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मनसेने अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP